Nov
09

अंताजी हरी

 

अंताजी हरी -जन्म सन सुमारे 1741 मृत्यु सन 1827 जन्म वाडा बसणी मौजे पुसाळे, पटवर्धन सरदारांच्या रियासतीत अनेक ब्राह्मण घराणी उदयास आली. त्यामधलेच अंताजी हरी कानिटकर यांचे घराणे होय. ह्यांचे वडील हरभटजी हे कागवाड येथे सन 1959 च्या अगोदर काही वर्षे स्थायिक झालेले होते. तेथे त्यांनी अक्कलकोट भोसले यांचेकडून इनाम संपादन केले होते. वयाच्या बाविसाव्या वर्षी सन 1763 व अंताजी हरी हे मिरज येथे गोविंदराव पटवर्धनाच्या पदरी येऊन राहीले. शरीरप्रकृतीने चांगले धडधाकट होते. त्यांचा स्वभाव धाडसी होता. पटवर्धनाच्या पदरी राहिल्यावर त्यावेळच्या दमदार तरूणांप्रमाणे अश्वारोहण, तलवार, भाला, बंदूक ह्या हत्यारांचा उपयोग इत्यादी प्रकारची त्यावेळची लष्करी विद्या त्यांनी आत्मसात केली. मिरजकर गोविंदराव पटवर्धन ह्यांच्या फौजेत त्यांनी प्रथम शिलेदार म्हणून चाकरी केली. अनके मोहिमांत भाग घेऊन त्यांनी आपल्या लष्करी कामगिरीच्या जोरावर नाव कमाविले. त्यांच्या उपजत गुणांत अनुभवाची भर पडत गेली, त्या मानाने ते गुण पटवर्धनांसारख्या पराक्रमी व गुणग्राही सरदारांच्या डोळ्यांत जास्तच भरू लागले. युद्ध हा एक शरीरबल व बुद्धिबल यांचा खेळ आहे. अंताजी हरी यांच्या ठायी बुद्धीची देणगी उपजत होती. लष्करी कामाचा अनुभव घेता घेता हजारो शिपाई हाताखाली वागवून सैनापत्य करावे अशी पात्रता त्यांच्या अंगी बाणू लागली. सवाई माधवरावांच्या मृत्यूनंतर पटवर्धन सरदारांनी बाजीरावाचे बंधू चिमाजी यांस अल्पकाळ पेशवेपदावर बसविले, त्यामुळे पटवर्धनांचे व बाजीरावाचे वाकडे आले. पटवर्धनांच्या संगतींत व राजकारणात अंताजी हरी सन 1796 च्या अगोदरपासूनच पुष्कळ वर्षे होते. ऐतिहासिक माहितीच्या भागात बाजीराव पेशवे यांचे एक पत्र छापले आहे. त्यात मजकूर असा आहे की, पुणे येथे अंताजी हरि नजर कैदेत होते व त्यांना 1796 साली बाजीरावाने पेशवेपद मिळाल्यावर मोकळे केले, व आपल्या गणेशवाडी गावी जाण्याकरिता त्यांना स्वदस्तुरचे अभयपत्र दिले. हेतू हा की वाटेत त्यांना पुन्हा कोणी अडकवून ठेव नये. त्या पत्राची नक्कल ऐतिहासिक माहितीच्या भागात छापली आहे. 

दैववशात्‌ आपल्या अंगचे कर्तूत्व दाखविण्याची संधीही अंताजी हरी यांना लवकरवच प्राप्त झाली. तो प्रकार असा- गंगाधरराव गोविंद आणि चिंतामणराव आप्पा पटवर्धन या चुलत्या-पुतण्यांमध्ये बरेच दिवस तंटा चालू होता. शेवटी सन 1809 मध्ये चिंतामणरावांनी जहागिरीची वाटणी मिळवून सांगली हे आपल्या जहागिरीचे मुख्य ठाणे केले. जहागिरीची वाटणी मिळविण्यांत चिंतामणराव आप्पांना रामचंद्र जोशी उत्तूरकर आणि अंताजी हरि कानिटकर या दोघांनी मोठी मदत केली. ह्यावेळी अंताजी हरि यांनी श्रीमंत चितामणराव आप्पांना नव्या जहागिरीचा जम बसविण्याकरिता एक हजार रूपये उसनवार दिले. चिंतामणराव अप्पा हे सांगली संस्थानचा अर्धशतक उपभोग घेऊन दि. 19 जुलै 1851 ह्या दिवशी मृत्यू पावले. ह्या दीर्घकाळात चिंतामणराव आप्पांनी मोठ्या फौजा पदरी ठेविल्या व त्यांच्या जोरावर कित्येक लढाया मारून व महत्त्वाच्या कामगिऱ्या करून पटवर्धनांच्या कीर्तीत मोठी भर टाकली. बऱ्याचशा लष्करी मोहिमांत सांगलीकरांच्या सेनेचे धुरीणत्व अंताजी हरी यांचेकडे असे. 

चिंतामणराव आप्पा सांगली संस्थानचा कारभार स्वतंत्रपणे करू लागले त्या काळी दुसरे बाजीराव पेशवे यांचा अंमल चालू होता. राज्यात अंदाधुंदी माजत होती. सातारा-मिरज-सोलापूर ह्या प्रांती दोन मोठी बंडे उद्धवली. भवानराव प्रतिनिधींचे एकुलते एक दुर्वर्तनी चिरंजीव श्रीनिवासराव हे कारभार करण्यास अपात्र होते. म्हणून त्यांची मातोश्री काशीबाई व कारभारी वळवंतराव फडणीस आणि मोरोपंत फडणीस ह्यांच्याकडे कारभार सोपवून नाना फडणीसांनी श्रीनिवासरावांना 

बरेच दिवस पुण्यात नजरकैदेत ठेविले होते. बाजीरावांच्या कारकीर्दीत सन 1803 मध्ये पुण्याहून पोबारा करून व आपल्या जहागिरीत जाऊन श्रीनिवासराव हे मातोश्री व कारभारी यांना विरोध करू लागले. त्यांना कित्येक उडाणटप्पू शिलेदार हा हा म्हणता येऊन मिळाले. या यादवीचा परिणाम असा झाला की पंतप्रतिनिधींच्या फौजेच्या टोळ्या प्रांतभर लुटमार करू लागल्या. 

दुसरे बंड फत्तेसिंग माने यांचे. होळकराने सन 1801 मध्ये पुण्यावर स्वारी केली व बाजीरावास पळवून लाविले. त्यावेळी होळकराच्या आघाडीच्या फौजेचा माने हा सेनापती होता. पुढे इंग्रजांच्या मदतीने बाजीराव पुण्यास आला. होळकर माळव्यात परत गेला, परंतु फत्तेसिंग माने हा बाजीरावाच्या भुलथापास बळी पडून होळकाराबरोबर परत गेला नाही. बाजीरावाने देऊ केलेली दहा लाखांची जहागिरी मिळेना तेव्हा त्यानेही बंड पुकारून प्रांतभर लुटालूट करण्यास सुरूवात केली. ह्या धामधुमीचा व बंडाहीचा उपशम करण्याकरिता बळवंतराव फडणीस यांनी फौजेचा खर्च देण्याचे कबूल करून सांगलीकरांची मदत मिळविली. दोघांमध्ये सर्व अटी ठरून करारही झाला. त्या कराराप्रमाणे सांगलीकरांची पाच हजार फौज घेऊन अंताजी हरी हे कऱ्हाड प्रांती गेले व पुढील उद्योगांस लागले. 

कासेगावची लढाई -फत्तेसिंग माने पंढरपूर प्रांती दंगा करीत फिरत होता. त्यावर फडणीस व अंताजी हरी यांनी प्रथम चाल केली. दि. 17 जुलै सन 1804 ह्या दिवशी मान्याचा मुक्काम कासेगाव येथे होता. तो मोठा फौजबंद व पराक्रमी सरदार होता. तो मोठ्या शौर्याने व हिरीरीने शत्रूवर तुटून पडला. परंतु विरूद्ध पक्षाने त्याचे काही चालू दिले नाही. फत्तेसिंग माने व त्याचे काही मातबर लोक ठार झाले. ह्या मोहिमेत पाच तोफा व सहाशे घोडे व इतर मोठी लूट अंताजी 

हरी यांस मिळाली, व ह्या कामगिरीबद्दल श्रीमंत चिंतामणराव आप्पासाहेब सांगलीकर यांनी उगार-खुर्द येथे सन 1813 मध्ये जमीन इनाम दिली. त्याचा निर्देश ऐतिहासिक माहितीच्या भागात दिला आहे. 

म्हसवडीची लढाई -माने यांचा दंगा मोडल्यावर फडणीस आणि अंताजी हरी यांनी प्रतिनिधीचा दंगा मोडण्याचे काम हाती घेतले. प्रतिनिधीचा एक मातबर सरदार सुभानराव माने हा दोन हजार फौजेनिशी सोलापूर प्रांती दंगा करीत होता. अंताजी हरी यांनी दि. 24 ऑक्टोबर 1804 रोजी त्यावर छापा घातला. चारदोन घटका मोठी घनचक्कर उडाली. सुभानरावाचा पुरा मोड झाला व त्याचा सर्व गोट अंताजी हरी यांच्या हाती पडला. सुभानराव तेथून कसाबसा जीव बचावून खटाव प्रांती पळाला, परंतु तेथेहि नाझरेकर शिंदे यांने त्यांच्यावर छापा घातला आणि त्याला ठार केले. अशा रितीने पंताच्या एका मातबर सरदाराची वाट लागली. 

रेटऱ्याची लढाई -पंताचा सर्वात मोठा सरदार मल्हारजी बोडके सरनोबत हा होता. कऱ्हाड प्रांती दोन हजार फौजा बाळगून तो दंगा करीत होता. दि. 5 डिसेंबर 1804 ह्या दिवशी अंताजी हरी यांनी त्यालाही अचानक गाठले. दोन घटका तुंबळ युद्ध माजले. मल्हारजी ठार झाला. त्याच्या बऱ्याच शिपायांची कत्तल झाली. सैन्याची दाणादाण झालेली पाहून मल्हारजीचा जखमी झालेला भाऊ जीव घेऊन पळाला. बोडके याचे चारशे घोडे व सर्व समान अंताजीपंत

कानिटकरांच्या हाती लागले. किन्हाईची लढाई -याप्रमाणे पंतप्रतिनिधींच्या दोन फौजांचा कानिटकरांनी फडशा पाडला. त्यानंतर फडणीस आणि अंताजी हे खुद्द प्रतिनिधीवर चालून गेले. प्रतिनिधी हा शूर व धोरणी सेनानी होता. त्याच्या धाडसाला तर सीमा नव्हती. पंत त्यावेळी किन्हाई येथे होता. त्या ठिकाणावर दि. 16 डिसेंबर 1804 रोजी फडणीस व कानिटकर हे चालून गेले. गावच्या ओढ्याच्या अलीकडे पंत तयारीने उभे होतेच. प्रथम चारदोन घटका तोफातोफी आणि बंदुकांचा गोळीबार उभयपक्षी झाला. त्यानंतर कानिटकर व फडणीस यांनी हल्ले सुरु केले. शत्रूस चकविण्यासाठी ओढ्यामध्ये प्रतिनिधींनी आपल्या फौजेतील हजार पाचशे अरब बंदुकवाल्यांस दबा धरून बसण्यास सांगितले व आपण स्वत: ओढ्याअलिकडे पिछेहाट करून किन्हाई गावचा आसरा धरला. त्यांची पिछेहाट खरीच मानून अंताजी हरी ह्यांनी एकदम चाल केली. गावात असरा धरून बसलेल्या पंतावर एकदम तुटून पडण्याकरिता अंताजी हरी व फडणीस ह्यांच्या फौजा ओढ्यात उतरताच तोच त्या अरबांनी एकदम बंदुका चालविण्यास सुरूवात केली. त्याबरोबर अंताजी व फडणीस ह्यांच्या फौजांची त्या अडचणीच्या जागेत फार नासाडी झाली. ऐनवेळी पंतही गावाबाहेर येऊन शत्रूच्या फौजावर तुटून पडला. अंताजी हरी व फडणीस यांचे काही नामांकित शिलेदार जागच्याजागी ठार झाले. कित्येक जखमी झाले. फौजांची दाणादाण उडाली. पंतांनी कानिटकरांच्या पाच तोफा व सर्व सामान लुटून घेतले. अशा परिस्थितीत अंताजी हरी हे आपल्या सहकाऱ्यांसह उरलेल्या फौजेला धीर देत मोठ्या मिनतवारीने पिछेहाट करीत पुसेसावळी येथे येऊन पोहोचले. 

रहिमतपूरची लढाई -ह्या विजयाचा फायदा पंतांना मिळाला नाही; कारण त्याच सुमारास सेनापति बापू गोखले फौजेनिशी पंतांचे पारिपत्य करण्यासाठी सातारा प्रांती जाऊन पोचले. सन 1804 च्या डिसेंबरच्या अखेरीस गोखले, अंताजी हरी व फडणीस ह्यांच्या फौजा एकत्रित झाल्या. मध्यंतरी लढाईची तयारी करून पंत यांनी आपला मुक्काम रहिमतपूर येथे नेला होता. त्या ठिकाणी तिघांच्या फौजा पंतावर चालून गेल्या. दि. 9 जानेवारी 1805 रोजी मोठी लढाई जुंपली. दिवसभर तुंबळ युद्ध झाले. संध्याकाळाच्या सुमारास पिछेहाट करून पंतांनी बोरगाव ह्या ठिकाणचा आसरा धरला. गोखले, अंताजी व फडणीस ह्यांच्या फौजांनी तेथेही त्यास वेढून टाकले. पताने तोफांची सरबत्ती सुरू केली. परंतु शत्रूच्या मोठ्या सैन्यापुढे आपण टिकाव धरू शकणार नाही ही गोष्ट लक्षात आणून ते फडणिसांच्या स्वाधीन झाले. पंत हे गुन्हेगार म्हणून आपण त्यांना पुण्यास घेऊन जाणार असा गोखल्याने आग्रह धरला. परंतु काशीबाई व फडणीस ह्यांनी स्वाधीन झालेल्या पंतास गोखल्यांचे ताब्यात देण्याचे नाकारले. अंताजी हरी ह्यांनीही गोखले ह्यास ह्या कामी विरोध केला. गोखले नाखूष होऊन पुण्यास परतले. रहिमतपूरच्या लढाईनंतर फडणीस आणि अंताजी हरी यांच्या फौजांची संगत सुटली. फौजेच्या खर्चांकरिता सांगलीकरांनी फडणिसाकडून तीन लक्ष रूपये घेतले. ह्यानंतर कर्नाटक प्रांती सांगलीकरांना मोहीम करावी लागली. तिकडे पुष्कळ देसाई फौजबंद होऊन धुमाकूळ घालीत होते. 1805 च्या मार्च महिन्यापासून एक वर्षभर चिंतामणराव आप्पांना कर्नाटकच्या मोहिमेवर राहावे लागले. 

सर्व पुंड देसायांचा मोड करून चिंतामणरावांनी त्यांच्यापासून मोठ्या खंडण्या वसूल केल्या. ह्या मोहिमेतही आघाडीच्या फौजेवर अंताजी हरी हेच सेनापती असत. कित्तुरकर देसाई यांचे नेगिनहाळ हे ठाणे घेण्याच्या कामी अंताजी हरी यांनी पराकाष्ठेचा पराक्रम केला. अंताजी हरी यांच्या पराक्रमांची विस्तृत आणि तपशीलवार माहिती "ऐतिहासिक लेखसंग्रहा'च्या पंधराव्या भागात ग्रंथित केलेली आहे. त्या भागात अंताजी हरी यांची पुष्कळ पत्रेही छापलेली आहेत. अंताजीपंत यांना सन 1807 मध्ये पेशव्यांच्या सांगण्यावरून चिंतामणराव आप्पासाहेब सांगलीकर याजकडून एक हजार रूपयांची रोख तैनात मिळाली. जरीपटका, (लगी) अबदागीर व दिवटी इत्यादी मानही मिळाले. अंताजीपंतावर सांगलीकरांचा फार लोभ होता. आपल्या स्वत:च्या राजवाड्यात त्यानी अंताजीपंतांना स्वतंत्रपणे राहण्यासाठी जागा 

दिली होती. अंताजीपंत व त्याचे धाकटे बंधू जनार्दनपंत हे एकमेकांच्या विचारे वागत. जनार्दपंत गणेशवाडी येथे राहून घरची व्यवस्था ठेवीत, त्यामुळे अंताजीपंतांना निर्धास्तपणे बाहेर राहून आपली लष्करी कामगिरी अखंडपणे बजाविता आली. जायगव्हाण, मंगावती, उगार, शिरगुप्पी इत्यादी ठिकाणी त्यांना इनामेही मिळाली. जायगव्हाण हा गाव प्रथम तैनातीखातर त्यांचेकडेच असे. नंतर नक्त नेमणूक मिळू लागली. त्यांचे गणेशवाडी येथे दोन मोठे वाडे व इतर ठिकाणीही घरे व मोठ्या जमिनी होत्या. रोकडही पुष्कळ होती. 

सन 1826 च्या सुमारास अंताजीपंताच्या शरीरी अस्वास्थ्य उत्पन्न झाले, त्यावेळी आपले पुत्र चार व आपले बंधू जनार्दन यांचे पुत्र दोन अशा सहाजणांत सर्व स्थावर व जंगम मिळकतीची सारखी वाटणी करावी अशा आशयाचे व्यवस्था-पत्र त्यांनी करून ठेविले. त्याअन्वये ह्या वाटण्या अंताजीपंत यांचे जेष्ठ पुत्र रामचंद्रपंत यांच्या पश्चात्‌ 1846 च्या सुमारास झाल्या. अंताजीपंत यांनी मिळविलेली तैनात सन 1915 सप्टेबरपर्यंत चालू होती. अंताजीपंताच्या व्यवस्था 

पत्राची नक्कल ऐतिहासिक माहितीच्या प्रकरणात छापली आहे. अंताजी हरी हे सन 1827 मध्ये गणेशवाडी येथे वारले. त्यांच्या मृत्यूची वार्ता त्यांचे बंधू जनार्दनपंत यांनी पुणे येथे श्रीमंत चिंतामणराव आप्पासाहेब सांगलीकर यांना कळविली. चिंतामणराव आप्पा ह्यांनी जनार्दनपंतांजवळ अंताजीपंताच्या क्रियाकर्मांतरासाठी दोन हजार रूपये दिले व दरबारला दुखवट्यानिमित्त दहा दिवस सुटी दिली. 

Sep
09

Logo for Kanitkar Kulvruttant & Trust

 

logo

We have launched Logo for Kanitkar Kulvruttant and TRUST. The Sword represents Bravery, pen (boru) represents authors, Panti (lamp) represents we have guided society (e.g. Late. Kashibai Kanitkar). The Banayan tree represents every growing family. In Bhagawat Gita Lord Krishna said “There is a banyan tree which has its roots upward and its branches down, and the Vedic hymns are its leaves. One who knows this tree is the knower of the Vedas.”

Sep
13

Nivedan in news papers

Nivedan is Loksatta printed in 13 Sep, 2011.

loksatta1nivedan-in-daily-sagarnivedan-ratnagiri-times-madhil-batmi1

Older posts «

» Newer posts